कराड | कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे पिस्तूलसह जिवंत काडतुसे बाळगल्याने तिघांना पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पथकाने पकडले. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. काल रात्री कारवाई झाली. चेतन श्याम देवकुळे (वय- 23), श्रीधर काशिनाथ थोरवडे (वय- 20), अतिश सुनील थोरवडे (वय- 27, तिघेही रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीधर थोरवडे व अतिश थोरवडे यांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. श्रीधर थोरवडे, अतिश थोरवडे व चेतन देवकुळे कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे आले होते. तेथे पिस्तुलाने दहशत करत होते. त्याची माहिती पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार प्रवीण पवार, सागर बर्गे, असिफ जमादार व दीपक कोळी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे सापळा रचून चेतन देवकुळे, श्रीधर थोरवडे, अतिष थोरवडे यांना ताब्यात घेतले.
यावेळी तिघांचीही अंगझडती घेतली असता चेतन देवकुळे यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. श्रीधर व अतिष दोघांना हद्दपार केले आहे. त्यांच्याकडे परवानगी पत्र नसल्याची पोलिसांना खात्री झाली. पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व मोबाईलसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.