नागपुरात मोबाइलमुळे विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; संसाराची झाली राख-रांगोळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 31 वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मोबाइलवर कुणाशी बोलत होती? याबाबत विचारणा केल्यानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पती झोपी जाताच संबंधित महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पूनम मनोज मेहता असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. त्या नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरातील सद्गुरू नगरात पती मनोज शिवप्रसाद मेहता आणि मुलासोबत राहत होत्या. मृत पूनम यांचे पती मनोज यांचे किराण्याचे दुकान आहे. या दोघां पती पत्नींमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र मागच्या काही काळापासून मृत पूनमला मोबाइलचे व्यसन जडले होते. ती आपल्या पतीपासून लपवून सतत मोबाईलवर कोणाशीतरी बोलायची. पती जवळ येताच ती पटकन मोबाईल बंद करायची.

यानंतर पतीने याबाबत विचारणा केली असता ती काहीच सांगत नव्हती. यामुळे पती मनोजच्या मनात तिच्या विरुद्ध संशय निर्माण झाला. त्यामुळे मनोजने पत्नी पूनमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पूनमचे फोनवरचे बोलणे काही कमी झाले नाही उलट वाढतच गेले. घटनेच्या दिवशीसुद्धा पूनम रात्री अकराच्या सुमारास मोबाइलवर गप्पा मारत होती. त्यावेळी मनोजने कुणासोबत बोलतेस हे सांग, असा हट्ट धरला. पण पूनमने काहीच सांगितलं नाही. यानंतर मनोजने पत्नीच्या कृत्याला कंटाळून तिच्या घरच्यांना फोन करून संबंधित प्रकाराची माहिती दिली. यानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असल्याची माहिती माहेरी कळाल्यामुळे पूनम अस्वस्थ झाली आणि तिने आपला पती झोपी गेल्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली.

Leave a Comment