हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भाजपा पक्ष कामाला लागला आहे. मतदारांचे मन जिंकून घेण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुख्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपचे मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण (Women’s Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. चौहान यांनी महिलांच्या आरक्षणामध्ये वाढ केल्यामुळे महिला वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.
नुकताच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी एक पाऊल पुढे टाकत सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुका तोंडावर आल्यामुळे चौहान यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयातून सरकार महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमधील महिलांसाठी शिवराज सरकारने ‘लाडली बहना’ (Ladali Behna) योजना सुरु केली आहे.
महिला दिना दिवशी मुख्यमंत्री चौहान यांनी महिलांच्या आरक्षणात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी ही घोषणा प्रत्यक्षात उतरवली आहे. यासंदर्भात अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला आरक्षणात वाढ केल्यामुळे आता सरकारी नोकरदार वर्गात महिलांचा सहभाग वाढणार आहे. दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये एकूण महिला मतदारांची संख्या 2 कोटी 62 लाख एवढी आहे. त्यामुळे भाजप सरकार सर्वात जास्त घोषणा महिला वर्गासंबंधीत करत आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर महिन्याला खात्यावर 1 हजार रुपये टाकले जातात.