जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने देण्यात आले आहे. तर 993 नागरिकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच 648 नागरिकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. परवानगी दिलेल्यांपैकी अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अनेक जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व त्यांची टीम सुट्टीच्या दिवशीही ऑनलाईन पध्दतीने परवाने देण्याची मोहीम राबवित असल्याने जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांची व जिल्ह्यातून जाणाऱ्यांची सोय झाली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतानाही जिल्हा प्रशासन परवाने देण्याचे काम करीत असल्याने नागरिक प्रशासनाचे आभार मानत आहे.
जिल्ह्यात बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून येण्यास परवानगी दिलेले नागरिक व त्यांची संख्या पुढीलप्रमाणे –
गुजरात-2941
राजस्थान– 119
मध्यप्रदेश- -40
झारखंड- -8 तर
इतर नागरिक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले आहेत. यामध्ये नाशिक, धुळे, औरंगाबाद, नंदूरबार, बुलडाणा मुंबई, पुणे, गडचिरोली, अहमदनगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जिल्ह्यतून बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिलेले नागरिक
नाशिक- -519
धुळे –233
औरंगाबाद–98
अहमदनगर- -96
इतर–47 याप्रमाणे आहेत.
बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्याबाबत तलाठी, तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलिस यांना कळवायचे आहे. तसेच आल्यानंतर तालुक्यातील आरोग्य केंद्रातून स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. स्वतः 14 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. असे न करणाऱ्या व्यक्तींची माहिती गावातील लोकांनी प्रशासनाला कळवायची आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवले जातील. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.