वाई | सोनगिरवाडी येथील इनामदार अॅटो स्पेअर पार्टस 1 दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानामधील चार ऑइलचे कॅन, नवीन क्लज प्लेटा, एक्सेल शॉप, टॉमी, अॅम्बेसिटरचा गिअर बॉक्स असे 70 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार मालक दाऊद हाजीसाहेब इनामदार यांनी सकाळी पोलिस ठाण्यात दिली. केवळ 4 तासात चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्याचा शोध घेत असताना ही चोरी दोघांनी केली असून, चोरी केलेले साहित्य श्रीरामनगर धोम कॉलनी (वाई) येथे ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून शेखर अशोक घाडगे (वय- 32, रा. सोनजाईनगर, वाई) व विकास तारासिंग चव्हाण (वय- 24, रा. धोम कॉलनी, वाई) या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये इनामदार अॅटो नावाच्या दुकानातून चोरीस गेलेला माल व किरणा मालाने भरलेली दोन प्लॅस्टिकची पोती असा एकूण 85 हजार रुपयांचा माल आढळला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी काल रात्री इनामदार ॲटो गॅरेज, तसेच व खानापूर (ता. वाई) येथील पदमश्री कम्युनिकेशन अॅण्ड किराणा स्टोअर्स या दुकानाची कुलपे तोडून चोरी केल्याचे कबूल या दोघांना अटक केली असून, पुढील तपास महिला पोलिस नाईक सोनाली माने करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोन्हऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भरणे, पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, महिला उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार किरण निंबाळकर, प्रसाद दुदुरकर, श्रावण राठोड यांनी केली.