वातावरण तापले : सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे 4 रुग्ण दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कडाक्याचे उन्ह पडत असल्यामुळे घामामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तर उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानात प्रचंड वाढ झाली असून, यामुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत 4 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याचा पारा वारंवार 39 ते 40 वर जात असून यामुळे अनेक आजार निर्माण होऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमान वाढत गेले. आता 40 वर पारा असून, यामुळे नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे उष्माघाताचे रुग्णही वाढत आहेत. उन्हामुळे काहींना भोवळ येत आहे तर काहींना श्वाच्छोस्वास घेण्यास त्रास होत आहे.

अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात चार रुग्णांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अनेक रुग्ण उष्माघाताच्या त्रासामुळे तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येत आहेत. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये. वाढत्या उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.