सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या ४ जणांना सातारा LCB ने ताब्यात घेतलं आहे. संशय येऊ नये म्हणून हे आरोपी चक्क ऍम्ब्युलन्स मधून आले होते. मात्र LCB ने सापळा रचत सदर आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल ५ कोटी ४३ लाख १० हजार किंमतीची व्हेल माश्याची उलटी जप्त कऱण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा ते पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ च्या सव्हिसरोडवर दिग्वीजय टोयोटा शोरुमच्या समोर ४ इसम व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रीस) विक्री करण्याकरीता कोणासही संशय येवू नये म्हणून एम.एच.०८ ए.पी.३४४३ या अॅम्ब्युलन्स मधून येणार आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाली. त्याअनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली पथक तयार करून त्यांना नमुद इसमांना ताब्यात घेवून काही आक्षेपार्ह मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे नमुद तपास पथकाने वनविभागाकडील अधिकाऱ्यांच्या मदतीने दिग्वीजय टोयोटा शोरूमचे समोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला. थोडयाच वेळात प्राप्त बातमीतील अॅम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.०८. ए.पी.३४४३ ही पुणे बाजूकडून सर्व्हिस रोडने सातारा कडे येताना दिसली, त्यास पथकाने थांबवून अॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता अॅम्ब्युलन्समध्ये एका पिशवीमध्ये एक काळपट पिवळसर रंगाचा ओबड star आकाराचा पदार्थ दिसून आला. त्याची वनअधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करता तो पदार्थ व्हेल माश्याची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरीस) असून तो प्रतिबंधीत आहे व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो १ कोटी रुपये किंमत असल्याचे स्पष्ट झालं. यानंतर त्या चारही इसमांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. २०६/२०२३ वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२ ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
आरोपींची नावे खालीलप्रमाणे –
१) सिध्दार्थ विठ्ठल लाकडे वय ३१ वर्षे रा. कासारविली ता. जि. रत्नागिरी,
२) अनिस इसा शेख वय ३८ वर्षे रा. शिवाजीनगर हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर,
३) नासिर अहमद रहिमान राऊत वय ४० वर्षे रा. भडकंवा ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी,
४) किरण गोविंद भाटकर वय ५० वर्षे रा. भाटीये ता. जि. रत्नागीरी