विश्वविजेत्या 4 मराठी खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीय चाहत्यांनी सर्व खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरात सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. नुकतीच टीम इंडियाने (Team India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून संध्याकाळी मुंबईत सर्वांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय संघातील ४ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. त्यामुळे प्रथमच टीम इंडियाचे खेळाडू आपल्याला विधिमंडळात पाहायला मिळतील.

प्रताप सरनाईक म्हणाले की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैसवाल हे महाराष्ट्राचे खेळाडू आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विनंती केली आहे कि या मुंबईच्या खेळाडूंचा सन्मान करावा. कारण यामुळे भविष्यात तयार होणाऱ्या नव्या क्रिकेटपटूंना यामुळे ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल. विधिमंडळाच्या आवारात ५ जुलैला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह मुंबईकर खेळाडू येणार आहेत. त्याबाबतचा अधिकृत ईमेलही त्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. उद्या या खेळाडूंचा सन्मान करावा. असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

दरम्यान, आज सकाळी दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंचे स्वागत केले. विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर सुरु झाला, ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मराठमोळ्या जोडीने चांगलाच ठेका धरला आणि गणपती डान्स करत चाहत्यांचे लक्ष्य वेधलं. आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने न लाजता किंवा कोणता अटीट्युड न दाखवता मनसोक्त डान्स करत पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचे मन जिंकलं. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवने सुद्धा गणपती डान्स करत फुल्ल एन्जॉय केला.

आज संध्याकाळी मुंबईत भारतीय संघाची ओपन बस मधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत हि रॅली निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया असं रोहित म्हणाला.