सातारा | सातारा जिह्यात अत्यंत मन सून्न करणारी व चिड आणणारी घटना घडली आहे. सोमवारी पहाटे दि. 21 रोजी फिरस्त्या असणाऱ्या कुटुंबातील अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सोनगाव (ता. सातारा) येथे रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका वृध्द दाम्पत्यांला आढळून आली. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. या गुन्ह्यातील नराधमाच्या शोधासाठी पोलिसांनी कसून मोहीम राबवली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरस्ते असणारे एक कुटुंब वास्तव्यास आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब झोपी गेले. पहाटे साडेसहा वाजता मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. मुलीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने कुटुंब भयभीत झाले. तोपर्यंत दुसरीकडे सोनगाव गावच्या हद्दीत एका वस्तीलगत वृद्ध दाम्पत्याला संबंधित मुलगी निदर्शनास आली. मुलीची अवस्था पाहून दाम्पत्यही गहिवरले. मुलीला तिच्या आई, वडिलांबाद्दल विचारल्यानंतर त्या मुलीने हाताने रस्त्याकडे बोट केले. वृध्दाने त्या मुलीला घेवून ती दाखवते त्या रस्त्याकडे नेले. मात्र तेथे कोणीही नव्हते. पुन्हा त्या मुलीला शुध्दीवर आणत आईबाबत विचारल्यानंतर ती पुन्हा दुसरीकडे हात दाखवू लागली. वृध्दाने तिकडे जावून पाहिल्यानंतरही तेथे कोणी नसल्याने वृध्द दाम्पत्य गोंधळून गेले. मुलीची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत असल्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीची अवस्था पाहून तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये पाठवले. मुलीचा फोटो काढून पोलिसांनी परिसरात व उसतोड कामगारांकडे जावून तिची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. सुमारे 8 वाजेपर्यंत पोलिसांची मोहिम सुरु होती. मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संबंधित कुटुंब पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्यानंतर त्याचवेळी सातारा तालुका पोलिसांना मुलगी सापडल्याचे समोर आले. फोटो दाखवताच त्या कुटुंबाने ती मुलगी त्यांची असल्याचे सांगितले. तात्काळ मुलीच्या आईला व कुटुंबियांना सिव्हीलमध्ये नेले. मुलीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तपासाच्या दृष्टीने व मुलीच्या तब्येतीमुळे तिला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले.