हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटातील ४० आमदार हे लवकरच महाविकास आघाडीत येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे आहे ते त्यांना समजलय असेही वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा भूकंप तर पाहायला मिळणार नाही ना? अशा चर्चा सुरु आहेत. प्रसारमाध्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. मात्र अजित पवार आणि शिंदे गटातील ४० आमदार हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यातील अनेकांनी संपर्क साधत असल्याची माहिती आहे, चर्चा जोरात आहे कारण महाराष्ट्रातील राजकीय वार हे महाविकास आघडीच्या बाजूने उभं आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर सुद्धा घणाघात केला.
दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो.अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही,जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे . भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.