हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चेन्नईहून पुण्याला येत असणाऱ्या भारत गौरव रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व प्रवाशांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार केल्यानंतर या 40 प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससूनमधील डॉक्टरांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, या सर्व घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री चेन्नईहून पुण्याकडे येत असणाऱ्या अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. या सर्व प्रवाशांना उलटया आणि मळमळ सारखा त्रास होऊ लागला. यासंदर्भात तातडीने रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली. मध्यरात्री भारत गौरव रेल्वे पुण्याच्या रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ससूनमधील डॉक्टर आणि कर्मचारी उपचारासाठी रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी सर्व प्रवाशांचे तपासणी केल्यानंतर निष्पन्न झाले की, प्रवाशांना विषबाधा झाली आहे.
यानंतर 40 प्रवाशांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रवाशांचे प्रकृती बघता काहींना ऑक्सीजन सेवा पुरवण्यात आले. तसेच, काहींना प्राथमिक उपचार करून बरे करण्यात आले. परंतु या सर्व घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. सांगितले जात आहे की, रेल्वेमध्ये देण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे या 40 प्रवाशांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे रेल्वेतील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा रेल्वे प्रशासन तपास करत आहे.
दरम्यान, 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळतात ससून रुग्णालयात 40 बेड तयार ठेवण्यात आले होते. तसेच, रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार सेवा देखील पुरवण्यात आली होती. त्यामुळे काही प्रवाशांवर स्थानकावरच उपचार करण्यात आले. तसेच ज्या प्रवाशांची प्रकृती जास्त गंभीर आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे आता सर्व प्रवाशांचे प्रकृती स्थिर आहे. परंतु या सर्व घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.