चिंताजनक!! महाराष्ट्रात फक्त 100 दिवसात 40 हजार टीबी रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाची माहिती

TB patients
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रात दिवसेंदिवस क्षय रोगाचा (TB) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाच्या (Health Department) अहवालानुसार, मागील १०० दिवसांत तब्बल ४० हजार नवीन टीबी रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभर राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेमध्ये १.३७ कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. ज्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. जागतिक स्तरावर टीबीचे सर्वाधिक रुग्ण भारतात असून, जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी २५ टक्के भारतात आहेत. विशेष म्हणजे, देशातील एकूण रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. ही आकडेवारी अत्यंत गंभीर असून आरोग्य क्षेत्राला मोठे आव्हान देणारी आहे.

२०२५ मध्ये मोठी वाढ

मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास, महाराष्ट्रात टीबीच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसते.

२०२१ – २ लाख रुग्ण

२०२२ – २.३४ लाख रुग्ण

२०२३ – २.२३ लाख रुग्ण

२०२४ – २.३ लाख रुग्ण

२०२५ – (फेब्रुवारी अखेरपर्यंत) ३९,७०५ रुग्ण

टीबी रोखण्यासाठी उपाययोजना गरजेच्या

दरम्यान, राज्यातील आरोग्य यंत्रणा टीबी नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहे. या आजारावरील मोफत उपचार, लसीकरण मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजना अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याची गरज आहे.

तज्ज्ञांच्या मते, टीबीचे निदान लवकर झाले तर उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. योग्य उपचार आणि काळजी घेतली तर टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जनजागृती आणि आरोग्य तपासणी मोहीम अधिक जोमाने राबवण्याची गरज आहे.

त्याचबरोबर, टीबी टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या सवयी आणि वेळेत तपासणी करणे गरजेचे आहे. विशेषतः वारंवार खोकला येणे, वजन घटणे, रात्री घाम येणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.