हॅलो महाराष्ट्र ऑनालाइन | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीचा देखील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 465 कोटी 99 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारभावात झालेल्या घसरणीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकार 465 कोटी 99 लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. याबाबतची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात 3 लाख 36 हजार 476 पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. सध्या कांदा उत्पादकांना लागणारे अनुदान 844 कोटी 56 लाख रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. मात्र, शासनाकडून पहिल्या टप्प्यात 465 कोटी 99 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, कोणताही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 जिल्ह्यातील पात्र कांदा लाभार्थ्यांची अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान मागणी अल्प स्वरूपाची असल्याने 100 टक्के अनुदानाप्रमाणे 22 कोटी 60 लाख 51 हजार 974 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर ,यवतमाळ, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येईल.
याचबरोबर 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अनुदान मागणी शंभर कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात 378 कोटी 58 लाख 95 हजार 807 रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे. यामध्ये, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर , अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश असेल. सरकारकडून मिळणाऱ्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईस मदत होणार आहे.