महाराष्ट्रात 48000 नव्या नोकऱ्या मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली गुडन्यूज

Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, गोदाम, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक्स हब यासारख्या क्षेत्रात सुमारे १.०९ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MOU) केले आहेत. या करारामुळे राज्यात ४८००० नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात उद्योजकांना सकारात्मक गुंतवणूक अनुभव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही यावेळी फडणवीसांनी म्हंटल.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर लिंगा येथे एकात्मिक कोळसा पृष्ठभाग वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्पात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, यामुळे ३०,००० रोजगार निर्माण होतील, तर पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड नंदुरबारमधील पॉलिमर उत्पादन प्रकल्पात २,०८६ कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाकडून करण्यात येईल ज्यामुळे ६०० लोकांना रोजगार मिळेल. औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअ‍ॅलिटी यांच्यावतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ₹5000 कोटींची गुंतवणूक केली जात असून, यातून 10,000 रोजगार निर्मिती होईल.

लोढा डेव्हलपर्स लिमिटेड ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणार आहे. त्यातून ६,००० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे १,५१३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक अन्न आणि पेये उत्पादन सुविधा उभारेल, ज्यामुळे ५०० रोजगार निर्माण होतील.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्य सरकारच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन आणि अमरप्रकाश अग्रवाल (एमजीएसए रिअॅल्टी), अभिषेक लोढा (लोढा डेव्हलपर्स लिमिटेड), केतन मोदी (रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड), अजित बडोदिया (अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड) आणि प्रणय कोठारी (पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्यात सामंजस्य करारांचे आदानप्रदान झाले.