Saturday, March 25, 2023

कोल्हापूरमध्ये ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन; हजारो रंगबिरंगी फुले नागरिकांच्या भेटीला

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । विविध परदेशी पद्धतीची फुलं-झाडं केवळ नर्सरी किंवा मोठ्या-मोठ्या बागेतच शक्यतो पाहायला मिळतात. मात्र कोल्हापूर महापालिका आणि कोल्हापूर गार्डन क्लबने अशा हजारो फुलांच्या आणि झाडांच्या प्रदर्शनाचे कोल्हापूरात आयोजन केले आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर गार्डन क्लबच्यावतीने ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं आहे. रंगीबिरंगी असणाऱ्या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढील ३ दिवस ही विविधरंगी फुलं पाहण्याची कोल्हापूरकरांना संधी मिळणार असून त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महावीर गार्डनमध्ये हजारो विविध रंगाचे गुलाब, झेंडूबरोबरच विविध जातींची फुलं आणि झाडं पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. याच गार्डनमध्ये फ्लॉवर शोचे आयोजनही करण्यात आलं आहे, त्यामुळे हे गार्डन आता आणखीनच कलरफुल झालं आहे. ३०० पेक्षा अधिक देशी-परदेशी फुलं या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. तसेच फुलं आणि झाडांसोबतच आपली बाग कशा पद्धतीने सजवायची याची माहिती फ्लॉवर शोमधून दिली जात आहे. प्रदर्शनासोबत सजावटीची स्पर्धाही याठिकाणी भरवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी यामध्ये सहभागी घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केले. शिवाय याठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले प्रत्येकजण सेल्फी काढताना पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

आजपासून तीन दिवसांसाठी भरविण्यात आलेल्या या फ्लॉवर शो फेस्टिव्हल पाहण्यासाठी कोल्हापूरसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. विविधरंगी फुलांच्या उत्तमोत्तम कलाकृती हे प्रदर्शनातील विशेष आकर्षण आहे. महापालिका आणि गार्डन क्लब माध्यमातून सुरू झाले आहे पुष्पप्रदर्शन प्रदर्शनाचे हे पन्नासावे वर्षे आहे. गेली ४८ वर्षे हे प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित करण्यात येत असून याला मोठ्या प्रमाणावर नागरिक, सामाजिक संस्था आणि उद्योग वर्गाचा पाठिंबा राहिला आहे. जर विकेंड सेलिब्रेट करण्याचा कोल्हापूरकरांचा काही प्लॅन असेल तर फुलांच्या या नयनरम्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या..!!