नागपूर मध्ये बांधले जाणार 5 नवे उड्डाणपुल; ट्राफिकची कटकट मिटणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर (Nagpur) महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर आहे. महाराष्ट्राच्या होणाऱ्या विकासासोबत नागपूर शहराचा विकास देखील  झपाट्याने होताना दिसून येत आहे. नागपूर अनेक मोठ्या शहरांशी उत्तम मार्गाने जोडलं जात आहे. त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. साहजिकच शहरांत रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागपूर शहरांत  सुद्धा वाहतूककोंडीची  समस्या उभी राहतांना दिसत आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरांत ५  वेगवेगळ्या मार्गांवर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

७९२ कोटी रुपये निधी मंजूर :

नागपूर शहरासाठी महारेलने पाच उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला होता. केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपुलांचे सादरीकरण केले होते. यानंतर जून महिन्यात या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. आता नगरविकास विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी या प्रकल्पाकरीता राज्याच्या नगर विकास विभागाने ७९२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

येथे होणार उड्डाणपूल :

रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्स्चेंज चौक ते भांडे प्लॉट : २५१ कोटी

– चंद्रशेखर आझाद चौक-गंगाजमुना ते मारवाडी चौक : ६६ कोटी

– लकडगंज पोलिस स्टेशन ते वर्धमाननगर : १३५ कोटी

– नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक : ६६ कोटी

– वर्धमाननगर ते निर्मलनगरी, उमरेड रोड : २७४ कोटी.

महारेलच्यावतीने या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार:

दक्षिण, पूर्व व मध्य नागपुरातील रस्त्यांवर उड्डाणपुलाची गरज व्यक्त करीत आमदार कृष्णा खोपडे यांनी केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. आता ७९२ कोटी रुपयांच्या निधी मिळाल्यामुळे लवकरच महारेलच्यावतीने या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.” डिसेंबर महिन्यात याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू. ” अशी माहिती पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.