हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर आता गुरांना लम्पी रोगांची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करूनच शेतकरी हतबल झाले आहेत. मुख्य म्हणजे, आता नांदेड जिल्ह्यात तब्बल 512 पशुंना लम्पी आजार झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त वासरांचे प्रमाण आहे. त्यामुळे, आशा पशुंची, वासरांची योग्यरीत्या काळजी घेण्यात यावी, त्यांना शंभर टक्के लसीकरण व आजारी जनावरे वेगळी काढून त्यांच्या सुश्रृषेसह लसीकरण करून त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात यावी असे, आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
197 गावात लम्पी आजाराचा फैलाव
मुख्य म्हणजे, लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये, अभिजीत राऊत यांनी सर्व शेतकऱ्यांना योग्यरीत्या सूचना दिल्या. सध्या नांदेड गावात 512 पासून लम्पी आजार झाल्यामुळे गावात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 75 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यामध्ये लम्पी आजार झालेल्या गावांची संख्या 197 एवढी आहे. त्यामुळे संपूर्ण गाव या आजारापासून आपल्या गुरांचे संरक्षण करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवत आहे.
3 हजार 618 लम्पी बाधित
त्याचबरोबर, लम्पी आजाराशी बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 643 एवढी आहे. जेथे लम्पी आजार पसरत चालला आहे. तर एकूण बाधित 480 गावांमधील 3 हजार 618 बाधित पशुधनापैकी 2 हजार 638 पशुधन आजारातून बरे करण्यात आले आहे. तसेच, सध्या 513 पशुधनावर औषोधोपचार सुरू आहे. यामध्ये 10 पशुधन अत्यवस्थ रुग्णामध्ये गणण्यात आले आहेत. यातील 466 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत सरकारने आजवर 1 कोटी 95 लाख 5 हजार एवढी रक्कम मृत झालेल्या पशुधनाच्या पशुपालकास वितरीत केली आहे.
जिल्हास्तरीय समितीची बैठक पार
दरम्यान, लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बाजूने सरकार प्रयत्न करत आहे. नुकतीच यावर उपाययोजना शोधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत, लम्पी आजारावर मात कशी करावी याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या लम्पी आजाराचा फैलाव वाढत असल्यामुळे शेतकर्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. यापूर्वी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी आजारामुळे गुरांना आपला जीव गमवावा लागला आहे.




