हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात लागोपाठ झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या दोन्ही घटनांनंतर आता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 43 तर मेयो रुग्णालयात 16 अशा एकूण 59 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 1 ते 3 ऑक्टोंबर रोजी या दोन्ही रुग्णालयांमध्ये 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात रेफर केलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे.
34 रुग्ण खासगीमधून सरकारी रुग्णालयात रेफर
समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या वेळी खाजगी रुग्णालयातून 34 रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांच्या उपचारावेळी आर्थिक पिळवणूक झाली होती, यानंतर शेवटच्या क्षणाला या रुग्णाला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर या प्रकरणात अशी ही माहिती समोर आली आहे की, रुग्ण मृत्यु पावला की, रुग्णांच्या नातेवाईकांना मेयो या सरकारी रुग्णालयातून ‘डेथ सर्टिफिकेट’ देण्यात येते. खाजगी रुग्णालय आपल्याकडील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी ठेवण्यासाठी शेवटच्या क्षणाला सिरीयस असलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवून देण्याचे काम करते.
उपचारासाठी आर्थिक पिळवणूक
इतकेच नव्हे तर, खाजगी रुग्णालयात दलालामार्फत रुग्ण पोहोचवतात त्या पोहोचवणाऱ्या व्यक्तीला कमिशन दिले जाते. तिथून पुढे मग रुग्णांकडून अधिकचे पैसे वसूल करून त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू केले जाते. शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांचे वरील पैसे संपल्यानंतर खाजगी रुग्णालय रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करतात. यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आपली आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे ही बाब लक्षात आली तरी त्यांना त्याच ठिकाणी राहून उपचार करण्याची वेळ येते. यानंतर शेवटच्या वेळी खाजगी रुग्णालय संबंधित रुग्णाला मेयोत रेफर करतात. यानंतर मेयोकडून संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना डेट सर्टिफिकेट देण्यात येते.
दरम्यान, ज्या 34 रुग्णांना खाजगी रुग्णालयातून रात्रीच्या वेळी प्रकृती खालवल्यामुळे मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते त्यांचा मृत्यु झाला आहे. यासंदर्भात माहिती देताना शासकीय रुग्णालयाने म्हटले आहे की, रुग्णांना सेवा देणे हे शासकीय रुग्णालयाचे कर्तव्य आहे. शासकीय रुग्णालयात कोणतेही अधिसूचना न देता अचानक रुग्ण रेफर होऊन येत असतात. त्यामुळे त्यांच्यावर देखील उपचार करणे ही आमची जबाबदारी असते. 2 ऑक्टोंबर 8 व्हेंटिलेटवरील आणि 7 अतिदक्षता विभागात रेफर होऊन आलेले रुग्ण होते. असे एकूण 15 रुग्ण खाजगीतून अत्यवस्थ स्थितीत आले होते. ज्यामुळे त्यांचा मृत्यु झाला.