नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या राजकोटमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये एका पाचवीच्या विद्यार्थिनीने ‘क्राईम पेट्रोल’ पाहून आत्महत्या केली आहे. सोमवारी हि घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी मुलीने हे कृत्य केले त्यावेळी घरी कोणीच नव्हते. या मुलीला क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया पाहायची खूप आवड होती. त्यामुळे यातूनच तिने आत्महत्या करण्याची पद्धत पाहिली असावी असा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत मुलीचे आई-वडील आणि कुटुंबात असलेले इतर सदस्य हे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी मुलीला देखील आपल्या सोबत येण्याचा खूप आग्रह केला पण तिने कार्यक्रमासाठी जाण्यास नकार दिला. दुपारच्या वेळेस जेव्हा कुटुंबीय कार्यक्रमावरून घरी परत आले. तेव्हा त्यांना मुलीच्या खोलीचा दरवाजा हा बंद दिसला. त्यांनी दार उघडण्यासाठी दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिलं असता मुलगी सिलिंगच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मृत मुलीला सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल पाहायला खूप आवडायचे ती पूर्ण दिवस याच सीरियल्स पाहायची. तिथूनच तिने आत्महत्या कशी करायची हे पाहिलं असेल अशी माहिती मृत मुलीच्या चुलत बहिणीने पोलिसांना दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.