विनाकारण फिरणार्‍या 172 नागरिकांतून 6 पॉझिटिव्ह

रविवारी दिवसभरात करण्यात आली 172 जणांची कोरोना चाचणी

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून नियुक्त पथकांनी रविवारी दिवसभरात 172 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.  त्यातून सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून संबंधितांना लगेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

लॉकडाऊन जाहीर करूनही नागरिक नियमांचे उल्लंघन करत रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार ब्रेक द चेनअंतर्गत महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार शहरात लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांची पालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाची अ‍ॅन्टिजेन चाचणी केली जात आहे.  यासाठी प्रशासनाने 15 पोलीस स्टेशनअंतर्गत 6 मोबाईल कार्यरत केल्या आहे.

या टीमद्वारे 9 ते साय 5 व साय 5 ते रात्री 1 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये विनाकारण रस्त्यांवर वावरणार्‍यांना पकडून त्यांची अ‍ॅन्टिजेन चाचणी केली जात आहे. रविवारी दिवसभरात 172 नागरिकांची चाचणी करण्यात आली.  यात 6 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले.  शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.