हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोल्हापूर शहरात झिका व्हायरसचे संकट वाढत चालले आहे. शहरात “घर टू घर” करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1 हजार 494 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 6 रुग्ण झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. आता या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. सध्या या व्हायरसचा वाढता धोका बघता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, झिका व्हायरसवर मात करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामुळेच कोल्हापूर शहरात घर टू घर सर्वेक्षण अंतर्गत 1 हजार 494 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यात 6 रूग्ण आरोग्य विभागाला संशयित आढळून आले आहेत. मुख्य म्हणजे, आरोग्य विभागाने 392 घरांचे सर्वेक्षण केले होते. ज्यात 243 गरोदर मातांची तपासणी देखील करण्यात आली.
दरम्यान, कोल्हापुरात व्हायरसचे वाढते प्रमाण बघता नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा, खिडक्यांना तसेच व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, परिसरात वा घरात सांडपाणी साठू देऊ नये असे महत्वाचे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच “सध्याच्या काळात गरोदर मातांनी डासांपासून संरक्षणासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी” ही महत्त्वपूर्ण बाब सांगण्यात आली आहे.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरसचे प्रमुख लक्षणे ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे आणि स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी अशी आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन कोल्हापूर महापालिकेने नागरिकांना केले आहे.