हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ करेल अशी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशामध्ये पुन्हा एकदा H1N1 व्हायरस म्हणजेच स्वाइन फ्लूचा (Swine Flu ) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या अहवालानुसार, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जानेवारी 2025 मध्ये 16 राज्यांमध्ये 516 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा बळी गेला आहे.
स्वाईन फ्लूचे महाराष्ट्रात 21 रुग्ण
स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत असल्याने केंद्र सरकारने तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तामिळनाडूमध्ये 209, कर्नाटकमध्ये 76, केरळमध्ये 48, जम्मू-काश्मीरमध्ये 41, दिल्लीमध्ये 40, पुद्दुचेरीत 32, महाराष्ट्रात 21 आणि गुजरातमध्ये 14 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.
मागील वर्षी 347 मृत्यूंची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर केलेल्या NCDC च्या अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात 20,414 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 347 जणांचा मृत्यू झाला. याआधी 2019 मध्ये सर्वाधिक 28,798 रुग्ण आढळले होते, त्यात 1,218 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे.
या टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, NCDC, ICMR, दिल्ली एम्स, PGI चंदीगड, NIMHANS बेंगळुरू यासह विविध विभागातील तज्ज्ञांचा समावेश आहे. H1N1 हा इन्फ्लूएंझा प्रकारातील व्हायरस असून त्यालाच स्वाईन फ्लू म्हणून ओळखले जाते. संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारांना लसीकरण, जनजागृती आणि आरोग्य सेवांवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वसामान्यांनी काय खबरदारी घ्यावी?
स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे, योग्य आहार घेणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. तसेच ताप, सर्दी, घसा खवखवणे, दम लागणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.