सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई शहरातील सिद्धनाथवाडी येथे दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून चाैकशी केली असता वाई आणि महाबळेश्वर येथून चोरलेल्या 6 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात प्रतिक लक्ष्मण भोसले (वय- 19 वर्षे, रा. शिरगांव, ता. वाई), हेमंत किशोर कदम (वय- 19 वर्षे रा. खेड (नांदगीरी) ता. कोरेगाव) या दोघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक उमेश गहीण, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, हेमंत शिंदे, अक्षय नेवसे हे शोध घेत होते. दरम्यान, संशयित सिद्धनाथवाडी येथे काळ्या रंगाची मोपेड सिद्धनाथवाडी येथे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. या मोपेडवरील प्रतिक भोसले, हेमंत कदम यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पोलिसांना दुचाकी चोर असल्याचे समजले.
गेल्या एक महिन्याच्या कालावधीत महाबळेश्वर येथून 1 बुलेट व 1 हिरो होंन्डा स्प्लेंन्डर दुचाकी तसेच वाई शहरातून 4 हिरो होंन्डा स्प्लेंन्डर दुचाकी अशा सुमारे 3 लाख रुपयांच्या 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी त्या दुचाकीपैकी काही दुचाकी दडवून ठेवलेल्या होत्या व काही दुचाकी आई, आज्जी आजारी असल्याने पैशाची गरज आहे, असे कारण सांगून विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर त्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. याबाबत वाई पोलीस स्टेशन व महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद आहेत. या गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सोनाली माने या करीत आहेत.