कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून मतदानाच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली. सातारा, सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणार्या कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दूपारी दोन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले असून आत्तापर्यंत बेलवडे बूद्रुक वगळता अन्य ठिकाणी शांततेत मतदान झाले. तर दुपारपर्यंत मतदारांनी मतदानास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी माहिती दिली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, रयत पॅनेल व संस्थापक पॅनेल अशा तिन्ही पॅनेलच्या माध्यमातुन दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. कराड तालुक्यातील रेठरे बूद्रुक येथील विविध मतदान केंद्रावर या तिन्ही पॅनेलच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी घेतल्या जात असलेल्या 148 मतदान केंद्रावर दोन वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान रेठरे खूर्द व रेठरे बुद्रूक येथिल मतदान केंद्रावर झाले होते.या केंद्रांसह विविध केंद्रावर निवडणूक अधिकारी अष्टेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सकाळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवी भोसले, विनायक भोसले यांनी रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी सर्व मतदान केंद्रावर दुपारपर्यंत शांततेत मतदान पार पडले. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही.