महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा अजून देखील संपर्क तुटलेला आहे. तब्बल एक महिना होत आला तरी तरी या गावांना जोडणारे रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत. याचा फटका या भागातील वयस्कर लोकांना बसू लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय.
रामचंद्र कदम यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला. नदीतून बोटीने रामचंद्र कदम यांना तापोळा या ठिकाणी उपचारासाठी निघाले असताना रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आता तरी जागे होवून या गावांना जोडणारे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरोशी गावाला चतुरबेट मार्गे जोडणारा रस्ता बंद आहे. तर रेनोशी मार्गे जाणाऱ्या मार्गावरही तापोळा येथे दरड कोसळलेली आहे. त्यामुळे या गावात कोणतीही सोयी- सुविधा पोहचत नाही. इतकेच नव्हे तर अतिवृष्टी झाल्यानंतर आज महिना उलटला तरी तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह प्रशासनाचे कोणीच खरोशी गावात पोहचलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.