औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. पाण्याच्या टाक्या बांधण्यासह कंत्राटदार कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी या 40 किलोमीटर मुख्य पाईपलाईनसह शहरात 1900 पैकी 700 किलोमीटरच्या अंतर्गत पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
राज्य शासनाने ऑक्टोबर 2019 मध्ये शहरातील 1680 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर केली. 12 डिसेंबर 2020 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र कंत्राटदार कंपनीने कार्यारंभ आदेश करण्यास विलंब केला. त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते, दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून योजनेच्या कामासाठी वारंवार पाठपुरवठा केला जात होता.
सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत वाढ झाल्याचे कारण देत निविदा दरापेक्षा 300 कोटी रुपये वाढवून देण्याची मागणी कंपनीने केली असल्याची चर्चा सुरू होती. मात्र राज्य शासनाने कंपनीला निविदेतील अटी शर्तीची आठवण करून देत काम सुरू करा अन्यथा निविदा रद्द करू असा इशारा दिला होता. त्यानंतर कंपनीने तेराशे आठ कोटी रुपयांच्या निविदेपोटी 26 कोटी रुपये अनामत रक्कम भरत कार्यारंभ आदेश घेतले व कामाला सुरुवात करण्यात आली.
औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कामाची पाहणी केली होती पुढील वेळ येईल तेव्हा प्रगती दिसली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले होते. त्यानुसार सध्या शहरात पाण्याच्या टाक्यांची कामे प्रगती पथावर आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या कामावर देखरेख सुरू आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता अजय सिंह यांनी सांगितले की महिनाभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी चे सर्वेक्षण पूर्ण केले. शहरातील 1900 किलोमीटरची पाईपलाईन आहे त्यापैकी 700 किलोमीटरचे सर्वेक्षण झाले आहे तसेच नक्षत्रवाडी येथील एमआरबी चे काम सुरू केले आहे.
60 किलोमीटरच्या पाईपची ऑर्डर
समांतर पाणीपुरवठा योजनेत शहरात मोठ्या प्रमाणात पाईपलाईन करण्यात आली होती असे असले तरी या योजनेअंतर्गत शहरात 1900 किलोमीटर पाईप टाकले जाणार आहेत दरम्यान सध्या शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू झाल्यानंतर या रस्त्याची तोडफोड होण्याची शक्यता आहे म्हणून कंपनीने या रस्त्याच्या कामासोबतच पाइपलाइन टाकण्यासाठी 60 किलोमीटर अंतराच्या पाइपची ऑर्डर दिली आहे सध्या जिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत तिथे हे पाइप टाकून ठेवले जातील असे अजय सिंग यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा