औरंगाबाद | जिल्ह्यातील आडुळ या गावांमधील एका शेतकऱ्याच्या चाऱ्याची गंजी व कपाशीच्या फसाटीला आग लागली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव शिवारात गुरुवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पंढरीनाथ अश्रुबा खाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खोडेगाव येथील शेतकरी पंढरीनाथ खाडे यांची बेंबळ्याचीवाडी शिवारातील गट क्रमांक 184 मध्ये शेती असून त्यांच्या शेतातील चाऱ्याची कांजी व कपाशीच्या फासाटीला काल सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच खाडे आग विझवण्यासाठी गेले. तेव्हा पाय घसरून पडल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यानंतर घटनेची माहिती घोडेगाव येथील पोलीस पाटील यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्याला कळवली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, सोपान टकले, संतोष टिमकीकर, बीट जमादार करंगळे, शिंदे यांनी घटनास्थळी येऊन व पंचनामा करून खाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.