हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत पुन्हा एकदा CNG च्या दरात वाढ झाली आहे. आता दिल्लीत सीएनजीची किंमत 79.56 प्रति किलो आहे. आजपासून म्हणजेच 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून हे नवीन दर लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 95 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दिल्लीत सीएनजी 78.61 रुपये किलो दराने विकला जात होता. गेल्या काही दिवसांपासून CNG च्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं आहे.
तस पाहिलं तर गेल्या वर्षभरात CNG च्या किमतीत जवळपास 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 1 ऑक्टोबर 2021 रोजी सीएनजी 45.5 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, तर आज 17 डिसेंबर 2022 रोजी सीएनजी 79.56 रुपये प्रतिकिलो झाला आहे. म्हणजेच गेल्या 14 महिन्यांत CNG प्रति किलो 34.06 रुपयांनी महागला आहे. CNG च्या या सततच्या दरवाढीमुळे सीएनजी गाड्या वापरणाऱ्यांची मात्र पुरती निराशा झाली आहे.
CNG दरवाढीचे नेमकं कारण काय?
CNG दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे यंदा नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यादरम्यान जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खरं तर रशिया हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूचा मुख्य पुरवठादार आहे. परंतु सध्या त्यांच्यावर लादलेल्या सर्व निर्बंधांमुळे युरोपीय आणि अमेरिकन बाजारपेठेत रशियन वायूचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे बाजारात सातत्याने भाव वाढत आहेत.
गॅसच्या किमतीच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या किरीट पारीख समितीने केंद्र सरकारला सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. नैसर्गिक वायू जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय होईपर्यंत सरकारने सीएनजीवर कमी उत्पादन शुल्क आकारले पाहिजे अशी शिफारस समितीने केली आहे.