औरंगाबाद – संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या गणेशोत्वासाठी यावर्षी एसटी महामंडळाने तब्बल २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद विभागातूनही 75 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत.
मुंबई तसेच पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या जादा बसेस सोडण्यात आल्या. या बसेसद्वारे कोकणातील चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर या गाड्यांचा परतीचा प्रवास 14 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण 16 जुलै पासून सुरु झाले होते. दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांच्या आनंदात भर पडली आहे.
कोकणात जाणाऱ्या या बसेस मुंबईतून सुटत असल्या तरी राज्यातील विविध विभागातून त्याआधीच बसेस मुंबईत दाखल होत असतात. त्यानुसार औरंगाबाद विभागातून देखील 5 व 6 सप्टेंबर रोजी 75 बसेस विशेष कोकणात जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. मराठवाड्यात गणपती उत्सवादरम्यान महालक्ष्मींचे आगमन होते. त्यामुळे मराठवाड्यातून इतर भागात जाण्यासाठी जास्तीच्या बसेस सोडण्याची गरज नसल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले होते.