सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 8 हजार 519 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण 11 हजार 259 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण प्रलंबित 2 हजार 263 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रक्कम 19 कोटी 81 लाख 1 हजार 984 रुपयांची वसुली करण्यात आली.
तसेच वादपूर्व 12 हजार 432 प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी तडजोडीने 6 हजार 256 प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण 4 कोटी 99 लाख 10 हजार 511 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. दि. 6 फेब्रुवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्ह मध्ये जिल्हामध्ये एकूण 750 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी दावे, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात पतसंस्था, फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत मालमत्ता पाणी पट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता.
जिल्ह्याचे ठिकाणी एकूण 7 आणि तालुका न्यायालयात एकूण 29 पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरिता पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाचे प्रभारी सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश बी. एम.माने यांनी सांगितले.




