एकाच वेळी 8 वेळा बटन दाबून भाजपला मतदान; निवडणूक आयोगाची तरुणावर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश येथे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवेळी एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एकाच वेळी ८ वेळा बटन दाबून भाजपला मतदान केल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतलं तसेच निवडणूक आयोगाने सदर केंद्रावरील अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा केलं आहे. फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदान केंद्र-३४२ येथे हा प्रकार घडला आहे.

व्हायरल विडिओ मध्ये आपण पाहू शकता कि एक तरुण कचाकच ८ वेळा भाजप उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबताना दिसत आहे. सदर तरुण अवघ्या १७ वर्षाचा असल्याचे बोललं जातंय. या व्हिडिओत तो स्वतःच हाताच्या बोटानी खुणवत सांगतोय कि मी ८ वेळा मतदान केलं. हा प्रकार गंभीर असल्याने निवडणूक आयोगाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जाणार आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून हा विडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, भाजपला आपला पराभव दिसत आहे. जनादेश नाकारण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला सामोरे जाताना आपली घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. नाहीतर सरकार स्थापन होताच, अशी कारवाई केली जाईल की भविष्यात कोणीही ‘संविधानाच्या शपथेचा’ अवमान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल.