नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे काळात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये जवळपास ८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. १ मे ते २७ मे पर्यंत तब्बल ३८४० विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. याद्वारे जवळपास ५० लाख स्थलांतरीत मजूर आपल्या घरी पोहचले. परंतु, श्रमिक रेल्वेने घरी निघालेल्या जवळपास ८० मजुरांचा त्याच्या रेल्वेमध्येच प्राण गेल्याची माहिती मिळत आहे.
एका वर्तमानपत्रानं आरपीएफच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ९ मे ते २७ मे दरम्यान श्रमिक रेल्वेत ८० जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लगेचच या माहितीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. श्रमिक रेल्वेत मृत पावलेल्या अनेक जण अगोदरपासूनच गंभीर आजारांशी झुंज देत होते, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यातील बहुतेक जण उपचारासाठी म्हणून शहरात आले होते परंतु, लॉकडाऊन सुरू झाल्यानं ते तिथंच अडकून पडले. विशेष रेल्वे सुरू झाल्यानंतर ते आपल्या घराकडे निघाले होते.
या अगोदर थकवा, गरमी आणि भुकेमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं होतं. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी श्रमिक रेल्वेत ८० जणांच्या मृत्यूला दुजोरा देतानाच लवकरच या व्यक्तींची अंतिम यादी जाहीर केली जाईल, असं म्हटलंय. राज्यांसोबत समन्वय साधल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली जाईल. आरपीएफच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ४ ते ८५ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. १ मे ते ८ मेपर्यंतच्या आकड्यांचा यात समावेश नाही.
नॉर्थ ईस्टर्न रेल्वे झोनमध्ये १८, नॉर्थ सेंट्रल झोन मध्ये १९ तर ईस्ट कोस्ट रेल्वे झोनमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रवासाकारतेवेळी श्रमिक रेल्वे नियोजित स्थानावर पोहचण्यासाठी घेत असलेला वेळ सुद्धा मजुरांच्या मृत्यूमागे असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक ट्रेन ९० घंटे विलंबाने चालत असल्यानं या लांब प्रवास दरम्यान जेवण आणि पाणी मिळत नसल्यानं अनेकांचे जीव गेल्याचे बोलले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”