हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. याकाळात महीला वर्ग 9 दिवस 9 विविध रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात. या रंगांना नवरात्रीत विशेष महत्त्व दिले जाते. कारण, प्रत्येक एका रंगामागे चालत आलेली परंपरा आणि संस्कृती आहे. हे 9 रंग प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे एक प्रतीक मानले जातात. आज आपण याचं नऊ रंगांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
नवरात्रीचे नऊ रंग
यावर्षी नारंगी, पांढरा, लाल, निळा, पिवळा , हिरवा, राखाडी, जांभळा, मोरपंखी असे नवरात्रीचे नऊ रंग आहेत. हे नऊ रंग आपल्याला संस्कृती आणि परंपरेची जाणीव करून देत काही विशिष्ट संकेत देखील देतात. दरवर्षी तेच रंग असले तरी या रंगांची क्रमवारी बदलत राहते.
1) नारंगी रंग – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आनंदाची भावना देतो. सूर्याची किरणे देखील केशरी रंगाची असतात. ते पाहून आपल्याला प्रसन्न वाटते.
2) पांढरा रंग – नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित करण्यात आला आहे. पांढरा रंग हा शांतता, पवित्रता चांगुलपणा, निरागसपणाचे प्रतीक मानला जातो. पांढरा रंग आपल्या मनाला शांत करण्याचे काम करतो.
3) लाल रंग – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. लाल हा रंग शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीत लाल रंगाला विशेष महत्त्व आहे.
4) निळा रंग – नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. निळा रंग हा अतुलनीय आनंदाची भावना आणि प्रसन्नता, स्तब्धता, शांतता देतो. तसेच, आपल्याला या रंगातून एक उर्जा मिळते.
5) पिवळा रंग – नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केले जाते. असे मानतात की, पिवळा रंग धारण करून पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर हा रंग संपन्न व्यक्तिमत्त्व, अध्यात्मात आवड हे गुण दर्शवतो.
6) हिरवा रंग – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी, विकास याचे प्रतीक आहे. त्यामुळे या रंगाला तितकेच विशेष महत्त्व आहे.
7) राखाडी रंग – नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करण्यात येते. असे मानले जाते की राखाडी रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यास वाईट विचारांचा विनाश होतो. राखाडी रंग तटस्थतेचा, संयमाचा, चेतनाशक्तीचे प्रतिक आहे.
8) जांभळा रंग – नवरात्रीच्या आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून महागौरीची पुजा केली जाते. जांभळा रंग नवचैतन्याचे प्रतीक आहे. जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास आणि त्यावर ताबा ठेवण्यास मदत करतो.
9) मोरपंखी रंग – नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग हा सद्भावना, सुंदरता, समृध्दीचे प्रतीक आहे. त्यामुळे या रंगाला नवरात्रीच्या रंगांमध्ये विशेष स्थान आहे.