कोल्हापूर | राज्यासह परराज्यात नावजलेला असलेल्या गोकुळ दूध संघाचे निवडणुकीसाठी रविवारी (2मे) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकपदासाठी ९९. ७८ टक्के मतदान झाले. एकूण तीन हजार ६४७ ठरावदारांपैकी तीन हजार ६३९ ठरावदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीपूर्वीच कोरोनाने तीन ठरावदारांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच ठरावदार मतदानास उपस्थित राहू शकले नाहीत. गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून सुरू होणार आहे. या निकालाबाबत कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात कमालीची उत्सुकता आहे. मंगळवारी दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल.
गोकुळ’च्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्तारूढ गटाविरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७० केंद्रांवर आज मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर ५० ठरावदारांच्या मतदानाची सोय करण्यात आली होती. ‘गोकुळ’ची निवडणूक रद्द व्हावी, यासाठी सत्तारूढसह काही संस्था उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, न्यायालयाने निवडणूक रद्द न करता ७० मतदान केंद्रांवर मतदान घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आजची निवडणूक झाली. करवीर, कागल, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा व शिरोळ या सात तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले.