कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खोडशी गावात दोन दिवस दहशत मजवणाऱ्या मगरीला अखेर कराड मधील प्राणी अभ्यासकांना पकडण्यात यश आले आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभू, आटके ते पाचवड फाटा या परिसरात स्थानिक शेतकर्यांसह ग्रामस्थांना मगरीचे दर्शन होत आहे. या घटना ताज्या असतानाच खोडशी गावानजीक असणार्या बंधार्यातही मगरीचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या 15 दिवसांपासून खोडशी परिसरात वारंवार खडकावर मगर विश्रांती घेत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर प्राणी अभ्यासकांनी या मगरीस पकडले आहे.
खोडशी येथे पकडलेली मगर मादी असून 10 फूट लांबीची आहे. मगर रेस्क्यू करण्यासाठी वन्य प्राणी बचाव पथक सदस्य योगेश चंद्रकांत शिंगण, सोहेल शेख, रोहित रत्नाकर कुलकर्णी, अजय महाडिक यांनी तब्बल 2 तासाच्या अथक परिश्रमातून मगर सुरक्षित रित्या पकडली. त्यानंतर वन विभागच्या ताब्यात मगर देण्यात आली. कृष्णा नदीतील मगरींचा अधिवास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून उगम पावणारी कृष्णा नदी व तिच्यामधील असणारा अनेक रहस्यमय प्राण्यांचा वावर यावर अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत प्राणी अभ्यासकांनी मांडले.
खोडशी येथील मगर रविवारी रात्री कृष्णा डेअरी चौकात हनुमंत भोपते, आबासो भोपते, दत्तात्रय भोसले, स्वप्निल भोपते यांना दिसली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. याच कालावधीत वनविभागाला सुद्धा माहिती देण्यात आली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मगर बंधार्याच्या परिसरातील ओढ्यात निघून गेली होती. त्यानंतर प्राणी अभ्यासकांनी व वन्य बचाव प्राणी पथकाने रेस्क्यू आॅपरेशन राबवत मगर पकडली.