कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील मराठवाडी जवळच्या वांग नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यास गेलेला येथील दहा वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. समीर राहुल वाघमारे पाण्यात बुडलेल्या मुलाचे नाव असून आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र मुलाचा शोध लागलेला नव्हता.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, येथील नवीन गावठाणात राहण्यास असलेला समीर दुपारी मराठवाडी धरणापासून जवळच असलेल्या वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यास गेला होता. त्या वेळी तेथे काही मुलेही पोहत होती. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बंधारा तुडुंब भरलेला होता. समीर पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्य मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्याच्या घरी याबाबत कळविल्यावर कुटुंबीय व ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.
ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारीही घटनास्थळी दाखल झाले. मराठवाडी धरणातील विसर्ग तात्पुरता थांबवून युवकांकडून रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्याचा शोध सुरू होता. मात्र, जोरदार पाऊस व अंधारामुळे रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. वाघमारे कुटुंब गरीब असून, भंगार गोळा करण्याबरोबरच मोलमजुरीवर त्यांची उपजीविका चालते. समीर पाचवीच्या वर्गात शिकतो. पोटचा गोळा पाण्यात बुडाल्याने त्या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba