सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण हळू हळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. या तिसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जर रुग्ण वाढले तर त्यांच्यासाठी अतिरिक्त बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत बेडची कमतरता भासू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पुढाकारातून साताऱ्यात १०० बेड्चे कोरोना हॉस्पिटल उभारले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाबरोबर आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचेही रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेले आहेत. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 122 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा झाली आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 15.57 टक्के असून, तो कोरोना बाधितांच्या मृत्यूदरापेक्षा 6.95 टक्के म्हणजेच सुमारे सातपट अधिक आहे. सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळय़ा बुरशीची लागण झालेले रूग्ण आढळले आहेत. अशात आता तिसऱ्या लाटेचाही धोका लक्षात घेता जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाकडून पुढाकार घेत आरोग्याचे उपक्रम राबविले जात आहेत.
इंडो अमेरिकन फाउंडेशनच्या वतीने सातारा शहरात १०० बेड्चे कोरोना रुग्णालय होत आहे. या हॉस्पिटलमध्ये १६ आयसीयू बेड, ८४ ऑक्सीजन बेड यांचा समावेश केला जाणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणारे हे एका कंटेनरचे हॉस्पिटल फोल्डेबल आहे. एका कंटेनरमध्ये आठ व्हेंटिलेटर बेड असणार आहेत. विशेष म्हणजे हे हॉस्पिटल पूर्णपणे वातानुकूलित अशा पद्धतीचे तयार करण्यात येत आहे.