औरंगाबाद | एन-11 हडको येथील नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष झाले नाही.अस्मिता संतोष वाघले (वय 12) असे या मुलीचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी आई मेसवर पोळ्या करण्यासाठी गेली असता अस्मिताने घराचा मेन दरवाजा लावून घेतला आणि समोरच्या रूम मध्येच छताच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतला.
ही घटना अस्मिताच्या छोट्या भावाला समजली असता त्याने आरडाओरडा केला. यानंतर तिच्या मामांनी तिला खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी रात्री साडेआठ वाजता तपासून मृत घोषित केले. अस्मिता प्रतिभा पाटील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होती. आई वडील आणि छोटा भाऊ हे चौघे जण सोबत राहत होते. आई मेसवर पोळ्या करण्याचे काम करत असून वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यामुळे दिवसभर घरी अस्मिता आणि तिचा छोटा भाऊ राहत असत.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली परंतु प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. या घटनेची सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गोराडे करत आहेत.