कराड | वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुंढे (ता. कराड) येथे दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. फरहान अमीर सय्यद (रा. गोटे, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. पाय व हाताला झालेल्या जखमेवरून त्याला शॉक लागल्याचे वीज कंपनीचे सहायक अभियंता अमोल साठे यांनी सांगितले. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलिसांत सुरू होती.
घरापासून जवळच्या उंबराच्या झाडावरील पाला काढून फरहान बकऱ्यासाठी नेणार होता. त्याने सोबत मित्रालाही नेले होते. दोघांनी तेथील शिडी लावून फरहान हातात कोयता घेऊन झाडावर चढला. त्याच्यासोबत आलेला मुलगा खाली शिडी धरून थांबला होता. फरहान फांद्या तोडत असतानाच, अचानक खाली कोसळला. त्याच्या हातातील कोयताही फेकला गेला.
फरहानला लोकांनी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी जाहीर केले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली. वीज कंपनीचे सहायक अभियंता साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. ज्या झाडावरून फरहान पडला, त्याच्याच शेजारून वीजवाहक तार गेली आहे.