औरंगाबाद | तिघी बहिणी मध्ये एकुलता एक असलेला भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधण्यासाठी माहेरी आणण्यासाठी जात असताना रस्त्यातच अपघातात या भावाचा मृत्यू झाल्याची घटना वरखेड तालुका गंगापूर फाट्याजवळ सोमवारी घडली.
शुभम अशोक शेवाळे (वय 20 रा. भिंगी बोरसर ता. वैजापूर)असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक होता. सोमवारी रक्षाबंधन निमित्त आपल्या मोठ्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी गंगापूरला दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी रांजणगाव पाटीजवळ समोरून येणारी इनोव्हा कारने(एम. एच-20 डि.ए 0-909) दुचाकीला जोराची धडक दिली. यात शुभम खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी शुभम च्या तिन्ही बहिणी अश्विनी आडवे ,आम्रपाली शिंदे, आणि वनिता लगड या एकत्र येऊन आपल्या लाडक्या भावाला राखी बांधणार होते. पण राखी बांधण्याऐवजी त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची वेळ या बहिणींवर आली. या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होते.