सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
स्वारगेट-महाबळेश्वर एसटीमध्ये आज गुरूवारी बंदुकीच्या गोळीसारखी वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी बसमध्ये धाव घेत गोळी ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून महाबळेश्वरला येणारी एसटी (एमएच-14- बीटी- 1226) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पाचगणी बसस्थानकात आली. यावेळी गाडीतील प्रवाशांना ही बंदुकीची गोळी दिसली. प्रवाशांनी वाहक धोत्रे यांच्या निदर्शनास ही गोळी आणून दिली. तोपर्यंत या घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून गोळी ताब्यात घेतली.
बसमध्ये सापडलेल्या गोळीबाबत वेगवेगळे तर्क वर्तविले जात असून पुण्याहून आलेल्या प्रवाशाकडेच पिस्तूल असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक सतीश पवार, स.पो.फौ माने, पो. हवा बाबर, म. पो. हवा. फरांदे, पो. ना. निलेश माने, म. पो. ना. साठे, पो. शि. जगताप असे घटनास्थळी जाऊन सदर गोळी जप्त केली असून पुढील तपास चालू आहे. पोलीस निरीक्षक सतीश पवार हे अधिक तपास करीत आहेत.