हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली. कराड-ढेबेवाडी मार्गावर कुसूर, ता. कराड गावच्या हद्दीत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या भरधाव गाडीने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या चौघा तरुणांना उडवले. त्यातील 1 जागीच ठार, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य दोघे जण या अपघातातून बालबाल बचावले. घटनेनंतर कुसूममधील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
सुजल उत्तम कांबळे (वय 17 वर्ष, रा. कोळेवाडी, ता. कराड) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची टोळी कुसूरमध्ये आणण्यात आली होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून टोळी उतरत होती. त्याचवेळी कोळेवाडीतील तरूण एकाला नेण्यासाठी दुचाकीवरून आला होता. यावेळी गप्पा मारत तीन-चार जण रस्त्याकडेला उभे राहिले होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार तरूणांना उडवले. दरम्यान, पोलिस गाडीमधील चालक शंकर खेतमर याने दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे ही अपघाताची घटना घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. तर इतर दोघेजण देखील जखमी झाले. आणि जखमीचे नाव समजू शकले नाही. मृत तरूण हा कोळेवाडीचा तर जखमी तरूण कुसूरमधील असल्याची माहिती मिळाली असून रात्री उशिरा पर्यंत पोलिसाकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.