कराड | किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत दोन गटातील 10 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. येथील शुक्रवार पेठ (काझीवाडा) येथे रात्री उशिरा 11.30 वाजण्याची सुमारास ही मारामारी झाली. या मारामारीत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
राकेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहते घरासमोर असलेल्या नाल्यातील कचरा बाजूला ठेवल्याच्या कारणावरून चिडून जाऊन अस्लम काझी, मुलगा मोबीन काझी याने फिर्यादीला हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच अस्लमचा मुलगा आलिम याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले व मोबीन अस्लम काझी, मुमताज अस्लम काझी यांनी फिर्यादीच्या आई-वडिलांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. तसेच पुतण्या संकेत यास विटाणे मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी अस्लम काझी मोबीन अस्लम काझी, आलिम अस्लम काझी, मुमताज अस्लम काझी सर्व रा. शुक्रवार पेठ (काझीवाडा) कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाली आहे.
तर अस्लम काझी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घरासमोरील असलेल्या गटारातील कचऱ्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत राकेश परशुराम साळुंखे यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीस मारहाण केली. तर किरण मुळे यांनी फिर्यादीस लाडकी दांडक्याने मारहाण केली. संकेत साळुंखे, परशुराम साळुंखे व सुशांत यांनी फिर्यादीचा मुलगा मोबीन व अलीम यांना हाताने व दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. सुलोचना साळुंखे यांनी फिर्यदीची पत्नी मुमताज यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी राकेश परशुराम साळुंखे, किरण मुळे, संकेत साळुंखे, परशुराम साळुंखे, सुशांत (पूर्ण नाव माहित नाही) व सुलोचना साळुंखे यांच्यावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्हीकडील एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएअसाय पवार तपास करीत आहेत.