हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईत मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांवरदेखील मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबईतील डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे चाचणी पूर्वीच उद्घाटन केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केले. मुख्य म्हणजे, या पुलाची चाचणी देखील झाली नसताना पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इतकेच नव्हे तर, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा पद्धतीने आणि शासकीय कामात अडथळा आणून डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असतानाही उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पुलाचे काम सात दिवसानंतर पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई पालिकेकडून करण्यात आले होते. परंतु असे असताना देखील पुलाचे उद्घाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन सुरू करून त्यावरून वाहतूक सुरू केली. अशाने पुलावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला. यामुळेच आदित्य ठाकरे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली.