हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपासूनच मुजफ्फरनगर येथील शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळी गेली आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणी आता अल्ट न्यूजचे सहसंपादक मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विद्यार्थ्याची ओळख उघडकीस आणल्यामुळे विष्णू दत्त नावाच्या एका व्यक्तीने मोहम्मद जुबेर यांच्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता मोहम्मद जुबेर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण?
नुकताच सोशल मीडियावर एक शाळेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळेतील शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गमित्रांकडून मारहाण करण्याचे आदेश देताना दिसत आहे. तर त्या शिक्षिकेचे ऐकून इतर विद्यार्थी देखील या मुस्लिम मुलांला मारहाण करत आहेत. या घटनेचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. तर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या मुलाला शाळेतून काढले आहे. इतकेच नव्हे तर, याप्रकरणी आता शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात जातीय द्वेष पसरवत असल्यामुळे हे प्रकरण जास्त चर्चेत आले आहे.
मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल
मुस्लिम विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विष्णू दत्त नावाच्या व्यक्तीने मोहम्मद जुबेर विरुद्ध मन्सूरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मोहम्मद जुबेर यांच्याकडून संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये या पिढीत विद्यार्थ्यांची ओळख उघडकीस करण्यात आली आहे. यामुळे बाल न्याय कायद्यांतर्गत बालकांच्या हक्कांचे उल्लंघन झाले आहे.
मोहम्मद जुबेर यांची प्रतिक्रिया
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहम्मद जुबेर यांनी म्हणले आहे की, सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मात्र तरी देखील गुन्हा फक्त माझ्यावर दाखल करण्यात आला आहे. मी या व्हिडिओला शेअर केल्यानंतर त्वरित डिलीट केले होते. यातूनच हे स्पष्ट होते की मला टार्गेट केले जात आहे. मी सध्या या प्रकरणात माझ्या वकिलांशी चर्चा करत आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी ठरवेल पुढे काय करायचे आहे.