औरंगाबाद: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न वाढताना दिसत आहेत. मात्र तरी देखील सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीये. अशातच औरंगाबादच्या पैठण तालुक्यात रांजणगाव खुरी येथून एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणखीन एक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका शेतकरी दांपत्याने दीड वर्षाच्या चिमुकली समोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गरीबी आणि विकट होत चाललेली आर्थिक परिस्थिती याच्या नैराश्यामुळे दाम्पत्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. राजू खंडागळे आणि अर्चना राजू खंडागळे असे दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनी आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर झाडाला गळफास लावून एकाचवेळी आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून लावण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजू खंडागळे यांच्या आर्थिक परिस्थिती हलकीशी असून त्यांच्याकडे फक्त दोन एकर शेती उदरनिर्वाहासाठी होते. मात्र या दोन एकर शेतीमध्ये कुटुंबाचा आर्थिक भार निघत नव्हता. यावर्षी अतिवृष्टीमुळे खंडागळे यांच्या पिकाचे देखील नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक तंगीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे या दाम्पत्याला अशक्य झाले. त्यामुळे आलेल्या नैराश्यात या दांपत्याने आत्महत्याचे पाऊल उचलले.
शुक्रवारी राजू खंडागळे आणि अर्चना खंडागळे हे दोघेजण आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन शेतात गेले होते. यानंतर सहा वाजता राजू यांच्या वडिलांनी त्यांना फोन लावून विचारणा केली तर त्यावेळी आपण शेतातून निघाले असल्याचे सांगितले. मात्र पुन्हा थोड्या वेळाने फोन लावल्यानंतर फोन उचलण्यात आला नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण या दोघांना पाहण्यासाठी शेतात गेले. तेव्हाच राजू आणि अर्चना गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.
यावेळी त्यांचे दोन वर्षाची मुलगी देखील तिथेच होती. पुढे, कुटुंबाने त्वरित या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. डॉक्टरांनी या दोघांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याची माहिती पोलिसांना लागताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आता पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करीत आहेत.