Wednesday, October 5, 2022

Buy now

साताऱ्यात शाॅर्टसर्किटमुळे जुन्या वाड्याला भीषण आग

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा शहरातील शनिवार पेठेतील जुन्या वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग अटोक्यात आण्याचा प्रयत्न करत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील शनिवार पेठेत सुनीता देवधर यांच्या जुन्या वाड्याला शाॅर्टसर्किटने आग लागली. अदालत वाड्याजवळ असेल्या या वाड्याला सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. लाकडी वाडा असल्याने आगीने राैद्ररूप धारण केले होते. सुदैवाने वाड्यात कोणी नसल्याने जीवितहानी झालेली नाही, मात्र अर्थिक नुकसान मोठे झाले आहे. काही उपस्थितांनी संसारोपयोगी साहित्या वाचविण्याचा प्रयत्नही केला.

वाड्यात आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तात्काळ काही जागरूक नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक विभागास माहिती दिली. तेव्हा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. आगीमुळे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले असून मोठे अर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.