सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील पोवई नाक्यावर दूध संघाच्या कार्यालयासमोर चालत्या डंपरला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. डंपरमध्ये रस्त्यावर टाकण्यासाठी डांबर मिश्रित खडी भरलेली होती.
शहरातील पोवई नाका येथे डंपरमध्ये खडी मिश्रित गरम डांबर असल्याने टायर गरम होऊन अचानक टायरने पेट घेतला असल्याची माहिती चालकाने सांगितली. आग लागलेला डंपर DHD इन्फ्राकाँन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. डंपरला आग लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली तसेच धुराचे लोट दिसू लागल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
शहरात डांबरीकरणासाठी डांबर मिश्रित खडी घेऊन चाललेला डंपरचा टायर फुटल्याने टायरने अचानक पेट घेतला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे ड्रायव्हरला जबर धक्का बसल्याने ड्रायव्हरची भीतीने दातखिळी बसली. स्थानिकांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चालकाला दाखल केले. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या साहाय्याने पेटलेला डंपर विझवण्यात आला. या आगीत डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.