हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातून (Pune City) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणीचे नाव रेणुका बालाजी साळुंके असे असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. तिला विद्यालयातील कॅन्टीनमध्ये काम करत असलेला कर्मचारी सतीश जाधव आणि तिचीच रूममेट मुस्कान सतत त्रास देत होती. या त्रासाला कंटाळूनच रेणुकाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. (Crime News)
नेमके काय घडले?
समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय रेणुका भारती महाविद्यालयात शिक्षण घेत याच हॉस्टेलमध्ये राहत होती. परंतु तिला हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि तिची रुममेट मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू त्रास देत होती. यालाच कंटाळून 7 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास रेणुकाने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला जाळून घेतले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की, आरोपी सतीश रेणुकाला सतत “आय लव यू” असे मेसेज करत होता. दिवसेंदिवस सतीशचे रेणुकाला मेसेज करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. तर दुसऱ्या बाजूला तिथेच मैत्रीण मुस्कान रेणुकाला अभ्यास करून देत नव्हती. ती सतत रेणुकाच्या अभ्यासात व्यत्यय आणायची. या सर्व त्रासाला रेणुका प्रचंड कंटाळली होती.
यामुळेच तिने 7 मार्च रोजी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेनंतर तिला तातडीने सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी म्हणजेच 19 मार्च रोजी रेणुकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही सर्व बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सतीश जाधव आणि मुस्कान सिद्धू या दोघांवरही वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. परंतु या सर्व घटनेमुळे भारती विद्यापीठात खळबळ उडाली आहे.