कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार दि. 6 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, खा. श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दि. 6 जानेवारी 2023 रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे ठिक दु. 12:30 वा. संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्यास सर्व संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक,आजी-माजी जि.प./ पं.स.सदस्य, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, या सत्कार सोहळ्यामध्ये आम्हीं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांचेही सत्कार करणार आहे. निवडणुकीत उमेदवार जरी पराभूत झाले असले तरीही त्यांनी एका प्रचंड धनशक्ती विरुद्ध लढा देऊन तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. राजकारणात हार-जित होत असते. देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार व माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) यांची शिकवण आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले तरच पक्ष वाढतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या सातारा जिल्हा मध्य. सह. बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.